नवी मुंबई Navi Mumbai Rain : नवी मुंबई येथील दुर्गा मातानगरमधील धबधब्याच्या परिसरात 60 हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास मिळाली. त्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलीसांसह मदतकार्यासाठी पाठवत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. याठिकाणी अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. अशाचप्रकारे पावणे एमआयडीसी परिसरात अडकलेल्या दोन नागरिकांचीही महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं पोलीसांच्या मदतीनं सुरक्षितपणे सुटका केली आहे.
मदतकार्य यंत्रणेस आपल्या क्षेत्रात सज्ज राहण्याचे आदेश : नवी मुंबई शहर समुद्रसपाटीच्या खाली वसलेलं असल्यानं उधाण भरतीची वेळी मुसळधार पाऊस असल्यास शहराच्या काही भागात पाणी साचतं, याची दखल घेत महानगरपालिकेच्या मदतकार्य यंत्रणेस आपल्या क्षेत्रात सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रविवारी दुपारी 12.10 वाजता 4.44 मीटर इतकी उधाण भरती होती व त्याचवेळी पाऊस संततधार कोसळत होता.
किती पर्जन्यवृष्टी : 21 जुलै रोजी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत नवी मुंबईत सरासरी 95.88 मिमी पावसाची नोंद झाली असून, बेलापूर विभागात 145.00 मिमी, नेरुळ विभागात 92.05 मिमी, वाशी विभागात 119.80 मिमी, कोपरखैरणे विभागात 130.95 मिमी, ऐरोली विभागात 39.80 मिमी, दिघा विभागात 47.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे पर्जन्यमान मागील 3 दिवसांपासून मोठं असून 20 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 21 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 85.87 मिमी, 19 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 20 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 75.17 मिमी पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 21 जुलै रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत एकूण 1273.26 मिमी इतकी पर्जन्यवृष्टी नोंद झालेली आहे.