जळगावTiger Skin Selling Case Jalgaon : जिल्ह्यातील नशिराबाद येथे पुणे व नागपूर येथील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या कस्टम विभागाने धडक कारवाई करीत वाघाचे कातडे विक्रीस आणलेल्या टोळीला शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता अटक केली आहे. याबाबत कस्टम विभागाने वन विभागासोबत तपास सुरू केला आहे. जळगाव न्यायालयाने टोळीतील ६ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कातड्याची किंमत 50 ते 60 लाख रुपये :भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या कस्टम विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ सापळा रचला. वाघाचे मोठे कातडे विक्रीस आलेल्या टोळीला त्यांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. (केसीएन) त्यांच्याकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले असून या कातड्याची किंमत साधारण ५० ते ६० लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.
'ही' आहेत आरोपींची नावे :या टोळीमध्ये अजवर सुजत भोसले (वय ३५ रा. हलखेडा हल्ली मु. चांगदेव, ता. मुक्ताईनगर), नदीम गयासुद्दीन शेख (वय २६, रा. अहमदनगर), मोहम्मद अंतर खान (वय ५८, रा. भोपाळ, मध्य प्रदेश), रहीम रफिक पवार (वय ४०), तेवाबाई रहीम पवार (वय ३५), कगंनाबाई अजवर भोसले (वय ३० सर्व रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य संशयित आरोपी अजवर भोसले याला घेऊन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात आणि मध्यप्रदेशात जाऊन घटनास्थळ पाहण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अजवत भोसले याच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर या ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
वाघाचं कातडं खरेदी करणारा तो कोण? :आज शनिवारी (२७ जुलै) रोजी त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकच्या कस्टम विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नेमकं हे वाघाचं कातडं कोण खरेदी करायला येणार होतं ? हा आता तपासाचा भाग आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जप्त केलेली कातडी ही तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार असून यासंदर्भात संशयित आरोपींकडून अधिक तपास केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संशयित आरोपी कडून ५ मोबाईल, २ दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आलं.
हेही वाचा:
- Smuggling Of Tiger Parts: पट्टेरी वाघाची कातडी तसेच पंजाची तस्करी करणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक
- Tiger Skin Smuggler : पवनी येथे वाघाच्या कातडीसह दोघांना अटक
- वाघाचे कातडे, पंज्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक