मुंबई Mumbai Mega Block :मुंबईत मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या प्लॅटफॉर्मचं काम करण्यात येत आहे. तर ठाणे येथेही प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरूय. त्यामुळं सलग तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉकमुळं मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मेगा ब्लॉकमुळं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आज किती गाड्या रद्द? :आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवरील तब्बल 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच फास्ट ट्रॅकवरील लोकल सेवा स्लो ट्रॅकवरती वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळं जिथं प्रवासाला एक तासाचा वेळ लागतो, तिथे दोन ते तीन तास वेळ लागत आहे. तसंच आज मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकपर्यंतच रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. तर हार्बर मार्गावरती वडाळापर्यंतच रेल्वे सेवा सुरू असणार आहे. तिथून पुढं रेल्वे प्रवास करता येणार नाहीय. तसंच ज्या वातानुकूलित रेल्वे आहेत, त्यातून रेल्वे प्रवाशांना आपल्या रोजच्या तिकीट आणि पासेसवरती प्रवास करता येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय.