मुंबई : एक हजार गुंतवणूकदारांना ३८० कोटींपेक्षा अधिकचा गंडा घालणाऱ्या सीए विरोधात मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्कुलर (LOC) अलीकडेच काढलं होता. अंबर दलाल असं लुक ऑऊट सर्कुलर काढण्यात आलेल्या सीएचं नाव आहे. फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांना अंबर दलाल यानं 54 कोटींचा गंडा घातल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तो आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त निषित मिश्रा यांनी दिली. या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी अंबर दलालला उत्तराखंड येथील डेहराडून परिसरातून आज अटक करण्यात आली आहे.
पैसे गुंतवणूकदारांनी दलाल याच्याकडं गुंतवल्याची माहिती : आरोपी अंबर दलाल याला न्यायालयात हजर केलं असता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात 15 मार्चला रिट्स कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीचा मालक अंबर दलाल याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जुहूतील फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांनी तक्रार दाखल केली होती. (एप्रिल 2023) मध्ये या फॅशन डिझाईनर बबीता मलकानींची मित्रमंडळींमार्फत दलाल याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर नफा देण्याचं आमिष दलाल यानं दाखवले होते. फॅशन डिझायनर बबीता मलकानी (वय 56) या महिलेने (एप्रिल 2023) ते (मार्च 2024)पर्यंत चार्टर्ड अकाउंटंट अंबर दलाल याला 54 कोटी 45 लाख रुपये दिले आहेत. या गुंतवणुकीत वेगवेगळ्या व्यक्तींची देखील गुंतवणूक आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक पैसे गुंतवणूकदारांनी दलाल याच्याकडं गुंतवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अभिनेत्याच्या कुटुंबाला 1 कोटीचा गंडा : अंबर दलालने अभिनेता अन्नू कपूरच्या कुटुंबाच्या 1 कोटी रुपयांवर देखील डल्ला मारला आहे. अभिनेत्याचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून दलालच्या सांगण्यानुसार गुंतवणूक करत आहे आणि अलीकडे त्यांना नियमितपणे मिळणार नफा मिळत नाही. दलाल अभिनेता अन्नु कपूरच्या बिल्डिंगमध्ये राहत असत आणि त्यामुळे ते त्यांना ओळखत होते. अन्नू कपूर यांचं कुटुंब एकटंच नाही तर अनेक पीडित आहेत. ज्यात ज्येष्ठ नागरिकांनी आपली पुंजी गुंतवली आहे. हे खूप दुःखद आहे. ही 1,200 कोटी रुपयांची फसवणूक असल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची, कंपनीची खाती, बँक व्यवहार तपशील आणि एकूण फसवणुकीचं प्रमाण तपासण्याच्या प्रक्रियेत आहेत, असं आर्थिक गुन्हे शाखेने अधिकाऱ्याने सांगितलं. फिल्म इंडस्ट्रीतील आणखी लोकांनी दलालला पैसे गुंतवणुकीसाठी दिले आहेत.