छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लागलेला निकाल अनेक राजकीय पक्षांना मान्य झालेला नाही. त्यामुळे बहुतांश पराभूत उमेदवारांनी त्यावर साशंकता व्यक्त केली. काही जणांनी तर फेरमतमोजणी करण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. तर न्यायालयात जाण्याची शेवटची तारीख असताना तब्बल 35 पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवत औरंगाबाद खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे.
या उमेदवारांनी घेतली खंडपीठात धाव :राज्यात अनेक मतदार संघात धक्कादायक पराभव मातब्बर उमेदवारांना स्वीकारावे लागले. त्यातील काही जणांनी खंडपीठात धाव घेतली. यामध्ये कैलास गोरंट्याल (जालना) यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात, सर्जेराव मोरे (लातूर) यांनी रमेश कराडांविरोधात, प्रवीण चौरे यांनी मंजुळा गावित यांच्या विरोधात, महेबूब शेख (आष्टी, जि. बीड) यांनी सुरेश धस यांच्या विरोधात, राजेश टोपे (घनसावंगी) यांनी हिकमत उढाण यांच्या विरोधात, राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्या विरोधात, राजू शिंदे (छत्रपती संभाजीनगर-पश्चिम) यांनी संजय शिरसाटांविरोधात याचिका दाखल केली आहे. बीडच्या केज मतदार संघातील पराभूत उमेदवार पृथ्वीराज साठे (केज) यांनी नमिता मुंदडा यांच्या विरोधात, बबलू चौधरी (बदनापूर) यांनी नारायण कुचेंविरोधात, चंद्रकात दानवे (भोकरदन) यांनी संतोष दानवे यांच्या विरोधात, बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ पाटील यांच्या विरोधात, सतीश पाटील (पारोळा) यांनी अमोल पाटील यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. याशिवाय राणी लंके, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोटे, संदीप वर्पे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.