महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांचा कल ओळखून होणार सर्वांगीण विकास; नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक घेत आहेत धडे - TEACHER TRAINING

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी अमरावतीत सुरू झालीय. शिक्षकांना येथे प्रशिक्षण दिलं जातय.

New Education Policy
नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक घेत आहेत धडे (ETV Bharat Reoprter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 3:51 PM IST

अमरावती: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षणाचं क्षेत्र इयत्ता नववीतच निवडता येणार आहे. अंगणवाडी आणि बालवाडी पासूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकास प्रक्रियेला वाव मिळावा या उद्देशानं शिक्षकांना देखील प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार केलं जातय. सध्या राज्यभरातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात प्रशिक्षण दिलं जातय. नव्या शैक्षणिक धोरणाचे धडे गिरवणारे शिक्षक नवीन शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना तयार करणार आहेत.



अमरावतीत 314 शिक्षक घेत आहेत प्रशिक्षण: शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था प्रबोधिनी येथे 3 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण 314 शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातय. 7 फेब्रुवारी पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षकांची देखील योग्य तयारी असणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनंच शिक्षक क्षमता विकास प्रशिक्षण अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षित केलं जातय. जिल्हास्तरावर आयोजित या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षित होणारे 314 शिक्षक पुढे प्रशिक्षक म्हणून तालुका स्तरावर 13 हजार 665 शिक्षकांना प्रशिक्षण देतील.

प्रतिक्रिया देताना डॉ. राम सोनारे आणि छाया मिरासे (ETV Bharat Reoprter)


मेंदूचा विकास आणि पंचकोशाचा समन्वय: नव्या शिक्षण धोरण अंतर्गत पायाभूत स्तराला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वय वर्ष 3 ते 8 या गटाचा पायाभूत स्तरामध्ये समावेश करण्यात आलाय. या वयोगटात मेंदूचा विकास हा अतिशय वेगानं होत असतो, हा विचार प्रामुख्यानं नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षक छाया मिरासे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासाचा पंचकोशाशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. प्राणवायू कोष, अन्नमयकोष, मनमयकोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष अशा पाच कोषांचा हा पंचकोश आहे. या पंच कोषाशचा बौद्धिकस्तर, मानसिकस्तर, ऊर्जाशक्ती आणि शारीरिक विकास यांच्याशी संबंध येतो. मेंदू शास्त्राच्या अभ्यासाचा आधार पायाभूत स्तर बळकट करण्यासाठी पहिल्यांदाच या नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत विचार केला जात आहे असं देखील छाया मिरासे म्हणाल्या.



शिक्षकांना 50 तासांचं प्रशिक्षण : राष्ट्रीय शिक्षण धोरण नेमकं काय आहे, ते समजून घेण्याकरता शिक्षकांना दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात पायाभूत स्तर आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षणस्तर अशा प्रकारच्या दोन भागाचा समावेश करण्यात आला आहे. क्षमता आणि अध्ययननिष्पत्ती यासोबतच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, विद्यार्थी विचार प्रक्रियेला चालना या सर्व गोष्टी कशा कार्यान्वित होतील यावर भर देण्यात आला. अमरावती जिल्ह्यात 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान एकूण 314 तज्ञांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. हे सर्व तज्ञ 8 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान जिल्ह्यातील 13 हजार 65 शिक्षकांना प्रशिक्षण देतील अशी माहिती, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. राम सोनारे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

तिसऱ्यांदा बदललं शैक्षणिक धोरण : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्यांदा 1968 मध्ये लागू झालं. त्यानंतर दुसरे शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आलं. आता 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं असून त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलय. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांचा कल कुठल्या विषयाकडं आहे हे शिक्षकांना कळू शकतं. यानंतर इयत्ता नववीतच विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेऊन पुढल्या शिक्षणाकरता त्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येणार आहे. देशाची भावी पिढी असणाऱ्या या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं याकरता प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना त्या दृष्टीनं प्रशिक्षित केलं जात आहे असं देखील डॉ. राम सोनारे यांनी सांगितलं.


360 अंशांचा विकास : आधीच्या अभ्यासक्रमात परीक्षा पद्धतीवर भर होता. आता मात्र सर्वच बाजूंनी विद्यार्थ्यांचा विकास हा 360 अंशांचा व्हावा यासाठी भर दिला जात आहे. जे काही ध्येय ठरवण्यात आलं आहे ते ध्येय गाठण्याकरता विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता निर्माण करायची आहे, त्या संदर्भात या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना प्रशिक्षित करण्यावर भर दिला जात आहे. असं प्रशिक्षण घेणाऱ्या कारला येथील सखाराम खरवडे विद्यालयाच्या शिक्षिका निता ठाणेकर यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा -

  1. घरातच अवतरले काश्मीरचे 'सोने'; राहुरीतील शिक्षक दाम्पत्याने घरातच फुलवली 'केशर'शेती
  2. नैराश्याला कलेनं दिली कलाटणी; अकाली सेवानिवृत्ती घेऊन घरी बसलेल्या शिक्षकानं निर्माण केली 'लाकूडसृष्टी'
  3. शिक्षणाचा खेळखंडोबा! बीड जिल्ह्यातील एका शाळेत इंग्रजीला शिक्षक नसल्याने पंचायत समितीमध्येच भरवली शाळा

ABOUT THE AUTHOR

...view details