नाशिक : राज्यात परतीच्या पावसाचा फटका सर्वाधिक नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना बसला आहे. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरला झालेल्या जोरदार पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. राज्यात एकूण 30 हजार हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे.
पावसामुळं पिकांचं नुकसान :ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात 30 हजार 506 हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकरी हताश झाला आहे. या पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील 26 हजार 338 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्या खालोखाल सांगली जिल्ह्यात 2 हजार 42 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं. 1ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात काढणीला आलेल्या कांदा, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी, भात, ज्वारी, मूगसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं चार महिन्यांचे कष्ट वाया गेल्यानं बळीराजा हताश झाला आहे.
चार जिल्ह्यांना सर्वाधिक फटका : परतीच्या पावसाचा फटका राज्यातील चार जिल्ह्यांना सर्वाधिक बसलाय. यात नाशिक, सांगली, भंडारा आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 30 हजार 504 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले आहेत. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 26 हजार 338 हेक्टर, सांगली 2 हजार 42 हेक्टर, भंडारा 1 हजार 28 तर ठाणे जिल्ह्यात 451 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे.