कोल्हापूर Kolhapuri Chappal : आकर्षक बांधणी, अस्सल कोल्हापुरी रुबाब, लुसलुशीत चमड्यापासून बनवलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलांच्या देखण्या रुपाची भुरळ सर्वांनाच पडते. मात्र, आता मूळ कोल्हापुरी चपलेच्या बांधणीत बदल न करता नव्या 30 डिझाईन बाजारात येणार आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं जिल्ह्यातील 30 महिला कारागिरांना प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यामुळं आकर्षक विणकाम, महिलांनी हाताने बनवलेल्या कोल्हापुरी चप्पलांचा नवा "स्वॅग" आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं 30 महिलांना प्रशिक्षण :केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयातच्या वतीनं भारतीय उद्योजकता विकास संस्था तसंच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कोल्हापुरात कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील कागल येथील महिला बचत गटाच्या विक्री केंद्रात 27 जुलैपासून कारागीर महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोल्हापुरी चपलांसाठी चामड्याचं कटिंग, विणकाम, रंगकाम, चपलेची शिलाई, यासह चामडे कापण्याचं प्रशिक्षण महिलांना देण्यात येत आहे. प्रशिक्षण घेतलेल्या 30 महिला कारागीर पुढील काळात 300 महिला कारागिरांना प्रशिक्षण देणार आहेत. यामुळं महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकलेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत.
या गावांच्या महिलांचा सहभाग : कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडे, चिंचवड, गडमुडशिंगी, गांधीनगर, नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, शिंगणापूर, पाचगाव या गावातील 30 महिला कारागीर सध्या प्रशिक्षण घेत आहेत. या महिलांना हस्तकला केंद्राकडून दिवसाला 300 रुपयांचा भत्ताही देण्यात येत आहे.
कोल्हापुरी चपलांची नवीन 30 डिझाईन : जगप्रसिद्ध असलेल्या मूळ कोल्हापुरी चप्पलांच्या बांधणीत बदल न करता नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी बनवण्यात आलेल्या 30 नव्या डिझाईन तयार करण्यात येत आहेत. केंद्रीय हस्तकला केंद्राचे डिझायनर ब्रिजेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काम करत आहेत. या डिझाईनमधून निर्मित केलेल्या कोल्हापुरी चप्पल बाजारात उपलब्ध होणार आहेत. प्रशिक्षण मिळालेल्या 30 महिलांकडून महिन्याला 15 हजार कोल्हापुरी चप्पलच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
यांचं मिळालं सहकार्य :या कार्यक्रमाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत कोल्हापुरात असलेल्या हस्तकला केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर सिंह, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, प्रकल्पाधिकारी सुषमा देसाई, कोल्हापूर लेदर अँड चप्पल वर्क्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनाजी खाडे, प्रभाग विकास समन्वयक अतुल ढबाले, प्रकल्प अध्यक्ष वैशाली गवळी यांचं मार्गदर्शन मिळालं.