ठाणेThane rape case verdict: शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाने टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं आपल्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना भिवंडी शहरातल्या किडवाई नगर भागात घडली होती. या प्रकरणी भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी दोषी नराधमाला अंतिम सुनावणीत 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मौनुद्दीन अजिजुल्ला अन्सारी असं शिक्षा सुनावलेल्या नराधमाचं नाव आहे.
चिमुकलीची आईकडे धाव :मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित चिमुरडी आई-वडिलांसह भिवंडी शहरातील एका परिसरात भागात राहात आहे. तर नराधम मौनुद्दीन हाही त्याच परिसरात राहणारा आहे. त्यातच 9 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्यानंतर आरोपीनं तिला टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं सोबत नेलं. त्यावेळी नराधमाच्या घरात कोणी नव्हतं. याचा फायदा घेत त्यानं पीडित चिमुरडीवर अत्याचार केला. नराधमानं केलेल्या अत्याचाराचा त्रास पीडितेला असह्य झाल्यानं तिने आईकडे धाव घेऊन तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईनं तिच्यासह शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर गुजरलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत 10 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती.