अमरावती Soil Erosion Problem Amravati:कृषीप्रधान राष्ट्र असणाऱ्या भारतात शेतीसाठी सुपीक जमीन ही अतिशय मोलाची आहे. असं असताना केवळ पावसाच्या पाण्यामुळं देशात दरवर्षी 21 टन माती वाहून चालली आहे. मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी शंभर वर्ष लागतात. असं असताना मातीची होणारी धूप ही शेतीसाठी अत्यंत मोठा धोका आहे. एकूणच मातीच्या होणाऱ्या ह्या धूप संदर्भात अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील मृदा संधारण विभागातील प्राध्यापक 'डॉ. दीपक पाडेकर' यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मातीची धूप थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.
पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप : भारतात वाऱ्यापासून होणारी धूप आणि पाण्यामुळं होणारी धूप अशा दोन प्रकारे जमीनीची धूप होते. यापैकी पाण्यामुळं सर्वाधिक प्रमाणात मातीची धूप होते. महाराष्ट्रात प्रामुख्यनं मातीची होणारी धूप हा अतिशय महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. भारतात एकूण साडेतीनशे दशलक्ष हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी 147 दशलक्ष हेक्टर इतकी जमीन खराब झाली आहे. त्यापैकी 94 दशलक्ष हेक्टर जमीन ही पाण्यामुळं वाहून गेली. त्यातही पुराच्या पाण्यात 14 दशलक्ष हेक्टर जमीन वाहून गेली असं प्राध्यापक डॉ. दीपक पाडेकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात अशी आहे परिस्थिती: महाराष्ट्रातील मातीही डेक्कनच्या पठारावरून तयार झाली असून राज्यात गाळाची जमीन आहे. महाराष्ट्राच्या जमिनीत मातीचे अगदी सूक्ष्म कण आहेत. महाराष्ट्रात जेव्हा पूर येतो त्यावेळी पाणी बरेच दिवस वाहते, ते जमिनीत मुरत नाही. यामुळं मातीचे सूक्ष्म कण वाहून जातात. 'आयसीएआर' अर्थात नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे लँड युज प्लॅनिंगच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण मातीपैकी 30 टक्के माती ही खराब झाली आहे. या 30 टक्क्यांपैकी 29 टक्के माती ही समुद्रात वाहून गेली. 61 टक्के माती ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी वाहून गेली. दहा टक्के मातीने शेततळी बुजवून टाकलीत. मातीची ही धूप फार मोठ्या प्रमाणात झाली.
शेत जमिनीवर असा झाला परिणाम : पाण्याची होणारी धूप यामुळं शेतातील मातीची गुणवत्ता घटली आणि त्यात असणाऱ्या सुपिकतेला नुकसान झाले. मातीच्या समृद्ध स्तरावरील पाणी साठवण्याची क्षमता यामुळं कमी झाली आहे. मातीच्या एकत्रीकरणात बिघाड होऊन मातीमधील अतिशय सूक्ष्म कणाचा थर वाहून गेला. अशा परिस्थितीत मातीची संरचना कमकुवत होत असून पोत देखील बदलतो. याचा विपरीत परिणाम मातीच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेवर होत असून पिक उत्पादन वाढ आणि उत्पन्न यावर मोठा परिणाम जाणवतो. अशा अवस्थेत खत कीटकाचे कोष कीटकनाशक हे देखील वाहून जात असल्यामुळं दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. मातीच्या धूपेमुळं मोठे तलाव जलवाहिन्या ह्या गाळाने भरून जातात आणि महापुरासारख्या समस्या उद्भवतात. यासह गाळामुळं गटार वाहिन्या, जलाशय हे देखील तुंबतात आणि मौल्यवान जमीन नष्ट होते.