मुंबई Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त) यांनी त्यांचे वकील विरल बाबर यांच्यामार्फत विशेष एनआयए न्यायालयात लेखी जबाब सादर केलाय. मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर अत्याचार करून उजवा गुडघा मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुरोहित यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, एटीएस अधिकारी माझी बेकायदेशीरपणे चौकशी करत होते. तसंच RSS-विश्व हिंदू परिषदेचे सदस्य तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी दबाव टाकत होते, असं त्यांनी लेखी जबाबात म्हटलं आहे. पुरोहित यांनी दावा केला की, 'ऑगस्ट 2008 मध्ये, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिना आधी, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार) यांनी अलिबागमध्ये एका सभेला संबोधित केलं होतं. ते केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत, तर हिंदू दहशतवादीही आहेत, असं विधान त्यांनी केलं होतं. 'हिंदू दहशतवाद हा शब्द त्यावेळी पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेचच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्दैवी घटना घडली'.
'एटीएसनं मला बेकायदेशीर कोठडीत ठेवलं' : '29 ऑक्टोबर 2008 रोजी मला अटक करण्यात आली होती. तरीही एटीएसनं मला अटक झाल्याचं दाखवलं नाही. मला अटक केल्यानंतर लगेचच खंडाळा येथील एका निर्जन बंगल्यात नेण्यात आलं. तिथं तत्कालीन एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे, परमबीर सिंग (तत्कालीन एटीएसचे सह आयुक्त) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली. 'हेमंत करकरे तसंच परमबीर सिंग यांनी मला वारंवार सिमी, आयएसआय तसंच माझ्या गुप्तचर नेटवर्कची माहिती देण्यास भाग पाडलं. मला डॉ. झाकीर नाईकच्या नेटवर्कबद्दल मॅपिंग करण्यात सांगितलं होतं. मी त्यांना माझे स्त्रोत तसंच नेटवर्कबद्दल माहिती देण्यास नकार दिला.
'माझ्या पाठीत वार' :पुरोहित यांच्या म्हणण्यानुसार, 'एक आर्मी ऑफिसर, कर्नल पीके श्रीवास्तव त्यावेळी माझे वरिष्ठ होते. त्यांनी माझ्या पाठीत वार करून मला एटीएसच्या ताब्यात दिलं. पोलीस कोठडीत माझ्यावर हल्ला करणारे, ते पहिलेच होते. यानंतर सहा हवालदारांनी मला बांधलं. त्यानंतर परमबीर सिंग यांनीही माझ्यावर हल्ला केला. कोणत्याही प्राण्यालाही होणार नाही, अशी वागणूक मला त्यांनी दिली. मला शत्रू देशाच्या युद्धकैद्यापेक्षा वाईट वागणूक मिळाली.