नाशिक200 Dengue Cases In Nashik:नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी विविध भागात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्करकडून घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हजार घरांमध्ये तपासणी केल्याचं महानगरपालिका आरोग्य विभागानं सांगितलं.
175 पथकांमार्फत घरोघरी तपासणी :नाशिक शहरात जुलैच्या दोन आठवड्यातच डेंग्यूचे 200 बाधित रुग्ण आढळल्यानंतर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने 500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून 175 पथकांमार्फत शहरात सर्वत्र घरोघरी तपासणी सुरू केली आहे. पहिल्या तीन दिवसात 492 जणांना डेंग्यू उत्पत्तीस्थळाच्या प्रति स्पॉट दोनशे रुपये प्रमाणे 1 लाख 13 हजाराचा दंड करण्यात आला आहे; मात्र 200 रुपयांच्या दंडाबाबत नागरिक फारसे गंभीर नसल्याचं लक्षात घेत आता प्रती स्पॉट 500 रुपये तर बांधकाम व्यवसायास प्रति स्पॉट पाच हजार ऐवजी दहा हजाराचा दंड आकारण्याचा प्रस्ताव आयुक्तांपुढे सादर करण्यात आला आहे.
महानगरपालिकेची उदासीनता :नाशिक शहरात जून महिन्यात जेव्हा डेंग्यूचे 161 रुग्ण होते तेव्हाच महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित होते; मात्र केवळ नागरिकांना घरातील कुलर आणि फ्रीजच्या मागील बाजूस असणाऱ्या पाण्यातून डेंग्यू पसरत असल्याचं प्रबोधन केलं गेलं. वास्तविक महानगरपालिकेकडून शहरात औषध, धूरफवारणी पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून करणे गरजेचं होतं; मात्र तसं झालं नाही आणि डेंग्यूचा प्रसार वाढत गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
महिना निहाय रुग्ण असे :जानेवारी 22, फेब्रुवारी 5, मार्च 27, एप्रिल 17, मे 39, जून 161, जुलै 200