मुंबई -महायुतीचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मुंबईत सदस्यांच्या आमदारकीच्या शपथविधीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर असे तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. यात सदस्यांच्या शपथविधी तसेच विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, शनिवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतलीय. मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घालत सभात्याग केलाय.
शपथविधीवर बहिष्कार काय? :एकीकडे सत्ताधारी पक्षासह समाजवादी आणि एमआयएम पक्षासह 173 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली असताना दुसरीकडे मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत सभात्याग केलाय. आपणाला विधानसभा निवडणूक निकाल अमान्य आहे. तसेच ईव्हीएममध्ये गडबड आहे, असं म्हणत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांतील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत सभात्याग केलाय. "निषेध म्हणून महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोलेंनी दिलीय. तर आज आम्ही शपथ घेणार नाही. शपथ घ्यायची का नाही याचा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी बोलून घेणार आहे. सरकारचा निषेध म्हणून आज शपथ घेतली नाही, असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
"या" सदस्यांनी घेतली संस्कृतमधून शपथ : सकाळी 11 वाजल्यानंतर सभागृहात सदस्यांच्या आमदारकीच्या शपथविधीला सुरुवात झाली. चैनसुख संचेती यांनी पहिल्या क्रमांकावर आमदारकीची शपथ घेतली. जयकुमार रावल यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. माणिकराव कोकाटे, आशिष जैयस्वाल, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. दरम्यान, गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नितेश राणे, प्रताप अडसर आणि राम कदम या सदस्यांनी संस्कृतमधून आमदारकीची शपथ घेतलीय. तर पराग शाह आणि अबू आझमी यांनी हिंदीतून आमदारकीची शपथ घेतलीय. दुसरीकडे एमआयएमचे मुफ्ती इस्माईल यांनी उर्दूतून आमदारकीची शपथ घेतली आणि भाजपाचे कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेतून आमदारकीची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारेंनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली.
खरं तर हा मतदारांचा अपमान :एकीकडे सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतलीय. यावेळी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख आणि एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माइल यांनीही शपथ घेतलीय. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षातील सदस्यांनी आमदारकीचा शपथ न घेताच सभात्याग केलाय. यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विरोधकांवर टीका केलीय. जनतेनं आणि ज्या मतदारांनी लाखो लाखो मतं देऊन आमदारांना निवडून दिलंय. त्यांनी आमदारकीची शपथ घेणे गरजेचं आहे. ज्या मतदारसंघातील समस्या आहेत. त्या सत्ताधाऱ्यासमोर मांडणे आवश्यक आहे. मात्र ते न करता विरोधकांनी बाहेर येऊन ओरडणे हे चुकीचे असल्याची टीका भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी शपथ न घेणाऱ्या आमदारांवर केलीय.
173 सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ, तर विरोधकांकडून शपथविधीवर बहिष्कार, कारण काय? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
7 डिसेंबर ते 9 डिसेंबर असे तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. यात सदस्यांच्या शपथविधी तसेच विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे.
एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)
Published : Dec 7, 2024, 6:14 PM IST