मुंबई Small Industries In Maharashtra: कुठल्याही राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात, रोजगार देतात; परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. राज्यात लघु उद्योग किंवा उद्योग-धंद्यांमुळे कुठल्याही राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी किंवा रोजगाराची टक्केवारी किती आहे हे कळते; मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये मागील चार वर्षांत राज्यातील 12 हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलै 2020 ते जुलै 2024 या चार वर्षांत एकट्या महाराष्ट्रात 12 हजार लघु उद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने संसदेत दिली आहे.
सरकारची उदासीनता :राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरातधार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे; परंतु या अडीच वर्षातच नाही तर त्याआधीही म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील लघुउद्योग बंद होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. हे लघु उद्योग सुरू राहावेत म्हणून मविआ किंवा महायुतीचे सरकार पुढाकार घेत नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
देशात 49 हजार लघुउद्योग बंद पडले :दुसरीकडे देशपातळीवर विचार केला तर गेल्या चार वर्षांत संपूर्ण देशात 49 हजार 342 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. या बंद पडलेल्या उद्योगधंद्यामुळे लाखो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लाखो लोकं बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगारीचा आकडा पाहिला तर लाखोंच्या घरात आहे. या उद्योगधंद्यामुळे साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळाला होता; परंतु देशपातळीवरही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. एकट्या महाराष्ट्रात 49 हजार पैकी 12 हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत, अशी माहिती एमएसएमई मंत्रालयाने संसदेत दिली आहे. धक्कादायक म्हणजे, या 12 हजार बंद पडलेल्या लघु उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील 5 लाख 4 हजारच्यावर कामगारांची संख्या होती. यांच्या हातून काम गेल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.