मुंबई :राज्यातील महायुती सरकारनं सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेस्टमध्ये महाव्यवस्थापकपदी असलेल्या अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सह सचिवाचीही बदली : महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबलगन पी. यांची बदली उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे सह सचिव डॉ. राधाकृष्णन बी. यांची बदली महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर करण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय डी. यांची बदली नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्तपदी करण्यात आली.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राहुल कर्डिले :वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर राज्य कर विभागात सह आयुक्त असलेल्या वनमती सी. यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांची बदली राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदी तर विवेक जॉन्सन यांची नियुक्ती चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यंत पांडा यांची बदली गडचिरोली जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. पुणे विभागातील महसूल विभागाचे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची बदली महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. सोलापूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी गोपीचंद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा
- विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर
- वडाच नाही तर मुंबईकरांचं पोट भरणारा पावही महागला; महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री
- ...तर अभयसिंहराजे भोसले मुख्यमंत्री झाले असते, उदयनराजेंनंतर शिवेंद्रराजेंचाही शरद पवारांवर निशाणा