कोल्हापूर Minor Girl Murder : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. इतरही काही अशाच प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत. या घटनांनंतर राज्यात लोकांचा या नराधमांच्या विरोधात उद्रेक निर्माण झालाय. आता याच घटनांची पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावात घडली असून गावातील रामनगर परिसरातील शेतवडीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केलाय. कामानिमित्त आलेल्या बिहारी जोडप्याची ही मुलगी आहे.
कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी बुधवार (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसात दिली होती. पोलिसांनी काल दुपारपासून शोध मोहीम राबवली. मात्र, मुलीचा पत्ता लागला नाही. त्यानंतर आज सकाळी ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं होतं. श्वान पथकानं मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतवडीत माग काढला. या ठिकाणी पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. लैंगिक अत्याचार करून या मुलीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलय. विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळं राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.