नवी दिल्ली Womens Asia Cup 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया चषक 2024च्या पाचव्या सामन्यात आज 21 जुलै रोजी UAE शी सामना करणार आहे. श्रीलंकेतील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतानं 7 विकेट्सनं जिंकला. दरम्यान UAE विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची ऑफस्पिनर खेळाडू बोटाला फ्रॅक्चर झाल्यानं संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झाली होती दुखापत : श्रीलंकेतील डंबुला येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटीलला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. श्रेयंकानं शुक्रवारी (19 जुलै) पाकिस्तानविरुद्ध 3.2 षटकं टाकली. 14 धावांत 2 बळी घेतले. तिच्या शानदार गोलंदाजीमुळं भारतानं पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला 108 धावांत रोखलं. भारतानं 14.2 षटकांत सात विकेट गमावून या सामन्यात विजय मिळवला. श्रेयंकानं भारताकडून 3 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्स आणि 12 टी-20 मध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. आता तिच्या जागी 26 वर्षीय तनुजा कंवरचा संघात समावेश करण्यात आलाय. तनुजा ही महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्स संघाकडून खेळते. तनुजा कंवर भारत अ महिला संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जाणार आहे.
- 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा? :भारताकडून स्मृती मंधाना महत्त्वाची खेळाडू ठरू शकते. मंधानानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 45 धावांची इनिंग खेळली. गेल्या 10 टी-20 सामन्यांमध्ये तिच्या नावावर 290 धावा आहेत. हरमप्रीत कौर आणि शेफाली वर्माही संघासाठी फलंदाजीत महत्त्वाचं योगदान देऊ शकतात. तर UAE कडून कर्णधार ईशा ओझावर सर्वांच्या नजरा असतील. गेल्या 10 टी-20 सामन्यांमध्ये ओझानं 298 धावा केल्या आहेत.
- हेड-टू-हेड रेकॉर्ड :भारतीय महिला क्रिकेट संघ आणि UAE महिला क्रिकेट संघ यांच्यात आतापर्यंत फक्त एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात आला. यामध्ये भारतानं UAE ला हरवून विजय मिळवला आहे. त्यामुळं या सामन्यात भारताचा UAE चा वरचष्मा दिसत आहे.