गयाना WI vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथं ते सध्या यजमान संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्याची सुरुवात अतिशय रोमांचक झाली. गयानाच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दोन्ही संघांमध्ये एकूण 17 विकेट पडल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 160 धावांवर सर्वबाद झाला असताना दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजनंही 7 विकेट गमावून धावसंख्या 97 अशी केली होती.
- कसोटी क्रिकेटच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 1902 मध्ये झालेल्या कसोटीत गेल्या होत्या. त्यात दोन्ही संघांच्या मिळून 25 विकेट गेल्या होत्या.
शामर जोसेफचे 5 बळी : यजमानांच्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच अडचणीत आणलं. सलामीवीर टोनी डीजॉर्ज अवघी एक धाव काढून जेडेन सील्सचा बळी ठरला. यानंतर शामर जोसेफनं मार्करम आणि कर्णधार बावुमाला तीन चेंडूंत बाद केलं. यानंतरही एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेनं 97 धावांवर 9 विकेट गमावल्या. यानंतर डॅन पीट आणि नांद्रे बर्जर यांनी अखेरच्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. यासह दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 160 वर पोहोचली. पीटनं संघासाठी 38 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घातक गोलंदाजी करणाऱ्या शामर जोसेफनं 5 फलंदाजांना बाद केलं. तर सील्सलाही 3 बळी मिळाले.
विआन मुल्डरपुढं वेस्ट इंडिजचे फलंदाज अपयशी : गयाना कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 160 धावांवर आटोपल्यानंतर विंडीज संघाला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या दिवसाच्या खेळात विआन मुल्डरची चमकदार गोलंदाजी पाहता आली नाही. वियाननं पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त 6 षटकं टाकली आणि 18 धावा देत 4 बळी घेतले. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला आपला बळी बनवण्याबरोबरच वियाननं अलिक अथानाजे, केव्हम हॉज आणि जोशुआ डी सिल्वा यांनाही आपला बळी बनवलं. पहिल्या दिवसाच्या खेळात विआन व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका संघाकडून नांद्रे बर्जरनं 2 तर केशव महाराजनं 1 बळी घेतला.
10 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठला नाही : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गयाना कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा अंदाज यावरुन लावता येतो की, दोन्ही संघांच्या डावांसह एकूण 10 खेळाडू असे होते की ज्यांना दुहेरी धावांचा टप्पाही गाठता आला नाही. यापैकी 5 खेळाडू असे आहेत जे शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.
- दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव : 160 (डेन पीट 38*, डेव्हिड बेडिंगहॅम 28)
- वेस्ट इंडिज गोलंदाजी : (शमर जोसेफ 5-33, जेडेन सील्स 3-45)
- वेस्ट इंडिज पहिला डाव : 97/7 (जेसन होल्डर 33*, केसी कार्टी 26)
- दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी : विआन मुल्डर 4-18, नांद्रे बर्गर 2-32)
- आघाडी : दक्षिण आफ्रिका 63 धावांनी पुढं
हेही वाचा :
- हॉटस्टार, जिओ सिनेमावर नव्हे तर कुठे बघता येईल वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका 'कसोटी'? - Where to watch WI vs SA Test
- स्वातंत्र्यदिनी सुरु होणार 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा; भारतीय संघाचे 'हे' दिग्गज खेळणार, राहुल द्रविडचा मुलगाही उतरणार मैदानात - Maharaja Trophy