KKR Get Deducted 12 Crore : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 18वा हंगाम 2025 मध्ये खेळवला जाईल. परंतु त्याआधी एक मेगा प्लेयर लिलाव आयोजित केला जाईल, ज्यासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यात IPL 2024 ची ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचाही समावेश आहे, ज्यांनी त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरला कायम ठेवलं नाही. तर KKR संघानं एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. ज्यात रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. अशाप्रकारे KKR नं आपल्या 120 कोटी रुपयांच्या पर्समधून एकूण 57 कोटी रुपये खर्च केले. परंतु त्यांच्या पर्समधून 12 कोटी रुपये अधिकचे कापले गेले आहेत, यामागे IPL गव्हर्निंग कौन्सिलचा मोठा नियम आहे.
KKR च्या खात्यातून 12 कोटी रुपये का कापले गेले : IPL 2025 च्या मेगा प्लेयर लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघानं रिंकू सिंगला 13 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं, तर त्यांनी वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 12 कोटी रुपयांना कायम ठेवलं आहे, तर हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये देऊन अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवलं. आता, 6 खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 57 कोटी रुपये खर्च केले असताना, प्रत्येक स्लॉटसाठी एक ठराविक रक्कम IPL गव्हर्निंग कौन्सिलनं आधीच निश्चित केली होती, अशा परिस्थितीत, जर खेळाडूला कायम ठेवायचं असेल तर त्यापेक्षा कमी पैसे मिळाले तर उर्वरित पैसे फ्रँचायझीच्या पर्समधून कापले जातील.