दुबई Scenario for Team India to Semi-Final : ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 4 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडनं भारतीय संघाला विजयासाठी 161 धावांचं लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 19 षटकांत 102 धावांत गारद झाला. या विजयासह न्यूझीलंडच्या महिला संघानं महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सलग 10 पराभवांची मालिका खंडित केली आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडनं सलग 10 सामने गमावले होते. मात्र या पराभवानं आता भारतीय संघाची उपांत्य फेरीत जाण्याची आशा फारच कमी दिसत आहे. दुसरीकडं, या पराभवानं 2021 च्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या जखमा पुन्हा एकदा उघडल्या आहेत. त्यावेळीही याच मैदानावर न्यूझीलंड संघानं स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.
भारतीय संघाचा प्रवास संपला? : न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा प्रवास जवळपास संपला आहे. भारताचा मोठा पराभव हे सर्वात मोठं कारण आहे. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानं 102 धावा केल्या आणि 58 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळं भारतीय संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे. तसंच नेट रन रेट खूपच खराब झाला आहे. भारतीय संघ सध्या एकही गुण न घेता -2.900 च्या नेट रनरेट (NRR) सह अ गटात पाचव्या स्थानावर आहे.
तीन सामने आहेत बाकी :या विश्वचषकात भारतीय महिला संघाचा प्रवास संपल्याचं मानलं जात आहे, कारण आता 3 सामने बाकी आहेत आणि तिन्ही सामने जिंकणं आवश्यक झाले आहे. या सामन्यांमध्ये संघाला 6 ऑक्टोबरला प्रथम पाकिस्तानशी सामना करायचा आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेशी सामना होणार आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आहे, जो 6 वेळा चॅम्पियन आहे.