महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताला मोठा धक्का; अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग कठीण

भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरु कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा धक्का बसला आहे.

WTC Point Table Update
भारतीय क्रिकेट संघ (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 20, 2024, 1:02 PM IST

बेंगळुरु WTC Point Table Update : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघानं एकतर्फी विजय मिळवला. यासह न्यूझीलंडनं 36 वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर हा पराभव भारतीय संघाला जड गेला आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही त्यांच्यासाठी काहीसा कठीण झाला आहे.

WTC पॉइंट टेबलमध्ये भारताला धक्का : ही कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ 74.24 विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर होता. मात्र या पराभवानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या विजयाची टक्केवारी 68.05 झाली आहे. 2023 ते 2025 या कालावधीत चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही तिसरी फेरी आहे. या तिसऱ्या चक्रात भारतीय संघानं आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. यात 8 सामने जिंकले आहेत तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील जास्त सामने : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या फेरीत भारतीय संघाचे आता 7 सामने बाकी आहेत. यातील दोन सामने त्यांना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहेत. त्याचबरोबर 5 कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जावं लागणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचं असेल तर किमान 5 सामने जिंकावे लागतील. याशिवाय 4 सामने जिंकल्यास, भारताला इतर कोणत्या तरी संघाच्या विजयावर किंवा पराभवावर अवलंबून राहावं लागेल. याचाच अर्थ भारतीय संघासाठी आता फायनलपर्यंतचा मार्ग कठीण झाला आहे. बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील विजयच भारतीय संघाला अंतिम फेरीत नेऊ शकतो.

बंगळुरुचा कसोटी सामन्यात 8 विकेटनं पराभव : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ते पहिल्या डावात केवळ 46 धावांत ऑलआऊट झाले. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघानं पहिल्या डावात 402 धावा केल्या. त्याचवेळी भारतीय संघानं दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत 462 धावा केल्या. अशा स्थितीत भारतीय संघानं या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडनं हे लक्ष्य अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आणि 36 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडनं 36 वर्षांनंतर रचला इतिहास; बेंगळुरुत 'रोहितसेने'चा दारुण पराभव
  2. रोहित होता एका वर्षाचा, कोहली 24 दिवसांचा; न्यूझीलंडनं भारतात कधी जिंकला होता शेवटचा कसोटी सामना?

ABOUT THE AUTHOR

...view details