मुंबई Virat Kohli Out on Diamond Duck : क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज शून्यावर बाद होतो तेव्हा त्याला 'डक'वर बाद होणं म्हणतात. याशिवाय पहिल्या चेंडूवर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला तर त्याला आपण 'गोल्डन डक' म्हणतो. पण क्रिकेटमध्ये, गोल्डन डकशिवाय, बॅट्समन 'डायमंड डक'वर देखील बाद होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला डायमंड डक काय म्हणतात ते सांगू.
'डायमंड डक' म्हणजे काय?
जेव्हा एखादा फलंदाज क्रिकेटच्या मैदानावर कोणताही चेंडू न खेळता बाद होतो तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात. यानुसार, जेव्हा एखादा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा राहतो आणि धाव घेताना एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद होतो, तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात. याशिवाय, वाइड बॉलवर फलंदाज स्टंप झाला तरीही त्याला 'डायमंड डक' म्हणतात.
आतापर्यंत किती खेळाडू झाले बाद : 'डायमंड डक' क्वचितच दिसत असलं तरी ते खूप मनोरंजक आहे. 1995 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखादा खेळाडू या प्रकाराचा बळी ठरला होता आणि तेव्हापासून कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 23 खेळाडू अशा पद्धतीनं बाद झाले आहेत. यात 5 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 1991 पासून 165 खेळाडू 'डायमंड डक'वर आउट झाले आहे. तसंच T20 क्रिकेटमध्ये 127 खेळाडू एकही चेंडू न खेळता आउट झाले आहेत.
राजेश चौहान : कसोटी क्रिकेटमध्ये डायमंड डकचा बळी ठरणारा पहिला भारतीय माजी क्रिकेटपटू राजेश चौहान होता. 1997 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकही चेंडू न खेळता तो नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद झाला होता.
नवज्योत सिंग सिद्धू :बांगलादेशनं 1998 मध्ये सिल्व्हर ॲनिव्हर्सरी इंडिपेंडन्स कप या त्रिकोणी मालिकेचं आयोजन केलं होतं. या मालिकेतील उर्वरित दोन संघ भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांचे होते. ढाका इथं पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 48 षटकांत 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर धाव घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू आणि सौरव गांगुली यांच्यात झालेल्या गैरसमजामुळं सिद्धू एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, अझरुद्दीन (84) आणि सचिन तेंडुलकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं यजमान संघाचा चार विकेट राखून पराभव केला.
राहुल द्रविड : 2004 चा पाकिस्तान दौरा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसाठी संमिश्र होता. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारत मोठ्या फरकानं पिछाडीवर होता. आकाश चोप्रा बाद झाल्यानंतर द्रविड पहिल्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या वीरेंद्र सेहवागला पाठिंबा देण्यासाठी आला. मात्र, धावा घेताना दोघांमध्ये समन्वय नव्हता आणि सेहवागच्या कॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात द्रविड एकही चेंडू न खेळता धावबाद झाला आणि शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.