बार्बाडोस (वेस्ट इंडिज) WI Beat ENG by 8 Wickets : वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात इंग्लंडला हरवून मालिका जिंकली आहे. 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकून वेस्ट इंडिजनं नवा विक्रम केला आहे. या मालिकेतील वेस्ट इंडिजनं पहिला वनडे सामना 8 गडी राखून जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं 5 गडी राखून विजय मिळवला होता. तिसरा वनडे सामना निर्णायक ठरला, जो वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं जिंकला आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकली.
इंग्लंडची आव्हानात्मक मजल : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकांत 8 गडी गमावून 263 धावा केल्या. सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि डॅन मौसली यांनी अर्धशतकं झळकावली. फिलिपनं 74 धावांची खेळी केली तर डॅन मौसलीनं 53 धावा केल्या. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का 7 व्या षटकात एव्हिन लुईसच्या रुपानं बसला. परंतु, त्यानंतर ब्रँडन किंग आणि केसी कार्टी यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 250 च्या पुढं नेलं. या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची विक्रमी भागीदारी झाली. यादरम्यान, ब्रँडन किंग आणि केसी कार्टी यांनी आपापली शतकं पूर्ण केली. वेस्ट इंडिजच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं झळकावल्याचं केवळ दुसऱ्यांदा घडले. याआधी 2006 मध्ये ख्रिस गेल आणि डीजे ब्रावो यांनी शतकं झळकावली होती.
वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजानी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेली शतकं :
- ख्रिस गेल (101) आणि डीजे ब्रावो (112*) - अहमदाबाद, 2006 (चॅम्पियन्स ट्रॉफी)
- ब्रँडन किंग (102) आणि केसी कार्टी (128*) - ब्रिजटाउन, 2024