सेंट किट्स WI Beat BAN in 1st ODI : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यानंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. त्याचा पहिला सामना रविवारी 8 डिसेंबर रोजी सेंट किट्सच्या मैदानावर खेळला गेला. वेस्ट इंडिज संघानं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला शेरफान रदरफोर्ड, त्याच्या वादळी शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिज संघानं या विक्रमी आव्हानाचा पाठलाग केला आणि बांगलादेशविरुद्ध 11 सामन्यातील पराभवाची मालिका संपुष्टात आणली. यासह वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विक्रमी धावांचा पाठलाग करताना रदरफोर्डनं ठोकलं शतक : सेंट किट्सच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघानं 295 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आजपर्यंत या मैदानावर कोणत्याही संघाला एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता आला नव्हता. शेरफान रदरफोर्डनं अवघ्या 80 चेंडूत 140 च्या स्ट्राईक रेटनं 113 धावा करुन सामना एकतर्फी केला. यादरम्यान त्यानं 7 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळं वेस्ट इंडिजनं 14 चेंडू शिल्लक असताना या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला. या जबरदस्त कामगिरीसाठी रदरफोर्डला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. एवढंच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून सलग 11 सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजनं विजयाची चव चाखली. वेस्ट इंडिजनं यापुर्वी 11 डिसेंबर 2018 रोजी मिरपुरमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी आता विजय मिळवला आहे.