नवी दिल्ली U19 World Cup Final :ऑस्ट्रेलियानं अंडर 19 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं 84 दिवसांत दुसऱ्यांदा भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं आहे. याआधी टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
भारतासमोर 254 धावांचं लक्ष्य :अंडर 19 विश्वचषकात भारतानं सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे खेळाल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 254 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आदर्श सिंग (47) मुरुगन अभिषेक (42) वगळता इतर खेळाडू कांगारू गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. मुशीर खान (22) मोठी खेळी करू शकला नाही. अर्शीन कुलकर्णी (3), कर्णधार उदय सहारन (8), प्रियांशू मोलिया (9), सचिन धस (8) या खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे महाली बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. कॅलम विडलरनं दोन गडी बाद केले.
रजस सिंगनं केल्या सर्वाधिक धावा :प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत सर्वबाद झाला. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 242/3 होती, जी इंग्लंडनं 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केली होती. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 64 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यानं तीन चौकारासह तब्बल तीन षटकार ठोकले. कर्णधार ह्यू वेबेन (48) सलामीवीर हॅरी डिक्सन (42) धावा केल्या . सॅम कॉन्स्टास खातं उघडता आलं नाही. रायन हिक्सनं 20, चार्ली अँडरसनने 13 आणि राफ मॅकमिलननं 2 धावांचे योगदान दिलं. ऑलिव्हर पीक 46 आणि टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीनं तीन तर नमन तिवारीनं दोन बळी घेतले. मुशीर खान आणि सौम्या पांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.