नवी दिल्ली U19 cricket World Cup 2024 : 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व उदय सहारनकडे तर दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व जुआन जेम्सकडे असेल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टरवर केलं जाईल. या सेमीफायनल मॅच आधी आम्ही तुम्हाला भारतीय टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
मुशीर खान : आजच्या सामन्यात मुशीर खान भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. मुशीरनं या विश्वचषकात भारतासाठी 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 334 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 84.50 आणि स्ट्राइक रेट 103.72 होता. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. फलंदाजीशिवाय त्यानं गोलंदाजीत 4 विकेट्सही घेतल्या आहेत. तो डाव्या हातानं फिरकी गोलंदाजी करतो.
उदय सहारन : टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारन या सेमीफायनलमध्ये महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. भारतीय कर्णधारानं 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 308 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 61.60 आणि स्ट्राइक रेट 84.46 आहे. भारताचं कर्णधारपद भूषवताना उदयनं आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांचाही योग्य वापर केला आहे.
सौम्य कुमार पांडे : टीम इंडियाचा उपकर्णधार सौम्य कुमार पांडेनंही या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यानं 5 सामन्यात 2.17 च्या किफायतशीर इकॉनामीसह 16 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची 19 धावांत 4 बळी ही सर्वोत्तम कामगिरी राहिली. या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडियाला उपांत्य फेरीत पुन्हा एकदा त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.
नमन तिवारी : डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारी यानं या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं 4 सामन्यात 4.24 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. आता उपांत्य फेरीत त्याच्याकडून अशाचा कामगिरीची अपेक्षा आहे.