WI vs UGA :टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि युगांडा हे संघ आमनेसामने होते. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर या सामन्यात यजमानांनी मोठा विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांत गारद झाला आणि विडिंजनं 134 धावांनी मोठा विजय साकारला. अकिल हुसैनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर यजमानांनी सलग दुसरा विजय मिळवलाय. अकिल हुसेननं सर्वाधिक 5 बळी घेत युगांडाच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.
वेस्ट इंडिजनं मोठा विजय नोंदवला :वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी योग्य ठरला. वेस्ट इंडिजचा हा दुसरा विजय आहे. या संघानं पापुआ न्यू गिनीविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता. तर युगांडाविरुद्ध वेस्ट इंडिजनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखलं आणि मोठा विजय नोंदवला. याआधी 2014 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध 39 धावांत गारद झाला होता.
वेस्ट इंडिजची फलंदाजी : वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स वेस्ट इंडिजकडून सलामीसाठी उतरले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची (28 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग बाद झाल्यावर संपुष्टात आली. किंगनं 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 13 धावा केल्या. त्यानंतर संघाला दुसरा धक्का युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबानं 10व्या षटकात निकोलस पूरनच्या रूपानं दिला. पुरणनं 17 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीनं 22 धावा केल्या.
यानंतर 13व्या षटकात जॉन्सन चार्ल्सच्या रूपानं वेस्ट इंडिजने तिसरी विकेट गमावली. चार्ल्सनं 42 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 44 धावा केल्या. त्यानंतर संघाला चौथा धक्का कर्णधार रोव्हमन पॉवेलच्या रूपानं बसला. पॉवेलनं 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 23 धावा केल्या. यानंतर 18व्या षटकात शेरफेन रदरफोर्ड पॅव्हेलियनमध्ये परतला. रदरफोर्डने 16 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावा केल्या. आंद्रे रसेल आणि रोमारियो शेफर्ड संघासाठी नाबाद राहिले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 33* (16 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान रसेलनं 17 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीनं 30* धावा केल्या आणि शेफर्डनं 5 चेंडूत 5* धावा केल्या.