गॉल SL vs AUS 1st Test Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज 29 जानेवारी (बुधवार) पासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॉल इथं खेळवला जाईल. ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या चक्रातील शेवटची मालिका आहे. ऑस्ट्रेलियानं आधीच WTC फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. परिणामी ते त्यांची विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर श्रीलंकेसाठी ही मालिका त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याची संधी आहे.
दोन्ही संघाची रणनिती काय :पहिल्या कसोटीपूर्वी, ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पुष्टी केली की ट्रॅव्हिस हेड सॅम कॉन्स्टास्कची जागा घेईल आणि पाहुण्या संघाच्या फलंदाजी क्रमात उस्मान ख्वाजा असेल. तथापि, ऑस्ट्रेलियानं गॉलमधील पहिल्या कसोटीसाठी त्यांची अंतिम प्लेइंग इलेव्हन जाहीर केलेली नाही. तर श्रीलंकेनं त्यांच्या कसोटी संघात अनकॅप्ड फिरकी गोलंदाजी अष्टपैलू सोनल दिनुशाची निवड केली आहे. अनुभवी स्थानिक खेळाडू लाहिरु उदाराचाही 18 सदस्यीय श्रीलंकेच्या संघात समावेश आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत धनंजय डी सिल्वा संघाचं नेतृत्व करेल.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड :ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं 64 वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं 36 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 4 सामने निकालाविना संपले आहेत. दोन्ही संघांमधील ही सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे.
खेळपट्टी कशी असेल :गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवरील खेळपट्टी नवीन चेंडूसह सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही मदत करते. तथापि, सामना जसजसा पुढं सरकतो तसतसे फलंदाज आणि फिरकीपटू खेळण्याच्या परिस्थितीचा आनंद घेतात. फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध लवकर जुळवून घ्यावं लागेल आणि चांगल्या पायांच्या हालचाली दाखवाव्या लागतील. गॉलची खेळपट्टी संपूर्ण सामन्यात फिरकी देते. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता असते आणि गॉलमधील चौथ्या डावात लक्ष्यांचा पाठलाग करणं कठीण होतं.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 29 जानेवारी (बुधवार) पासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॉल इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरु होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.