नेल्सन SL Beat NZ in 3rd T20I :न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा T20 सामना 2 जानेवारी रोजी सॅक्सटन ओव्हल, नेल्सन इथं खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं न्यूझीलंडचा 7 धावांनी पराभव करत क्लीन स्वीप टाळला. मात्र, कीवी संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात कुसल परेरानं श्रीलंकेकडून शतक झळकावलं. कुसल परेरानं 46 चेंडूत 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार चारिथ असलंकानं 24 चेंडूत 46 धावांची खेळी केली. ज्यात त्यानं एक चौकार आणि 5 षटकार मारले. तसंच गोलंदाजीतही कर्णधार चारिथ असलंकानं 3 बळी घेतले.
एका सामन्यात 429 धावा :न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या T20 मालिकेतील शेवटच्या सामना इतका चुरशीचा होता की मोठी धावसंख्या असूनही विजय-पराजयामधील फरक फक्त 7 धावांचा होता. या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघानंही आपलं सर्वस्व पणाला लावलं पण लक्ष्यापासून 7 धावा कमीच राहिल्या. त्यांनी 20 षटकांत 7 गडी गमावून 211 धावा केल्या. अशाप्रकारे, दोन्ही संघांच्या धावसंख्येची बेरीज करुन, सामन्यात एकूण 429 धावा झाल्या, ज्या दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या T20 सामन्यातील एकूण धावांचा एक नवीन विक्रम आहे.
कुसल परेरानं श्रीलंकेसाठी झळकावलं सर्वात जलद T20 शतक : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं 218 धावा केल्या. कारण त्यांच्याकडून कुसल परेरानं शतकी खेळी केली. त्यानं श्रीलंकेसाठी सर्वात जलद T20I शतक झळकावून एक नवा विक्रम रचला. कुसल परेरानं न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं अवघ्या 44 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 4 षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. श्रीलंकेसाठी सर्वात जलद T20 शतक झळकावण्याच्या बाबतीत, परेरानं 2011 मध्ये दिलशानचा 55 चेंडूत शतकाचा विक्रम मोडला.