केपटाऊन SA vs PAK 2nd Test Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स इथं खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 नं आघाडीवर आहे.
पहिल्या सामन्यात काय झालं : पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठलं. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडं पाकिस्तान संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
आफ्रिकेच्या भूमिवर पाकिस्तानची खराब कामगिरी : दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानचा विक्रम तितकासा प्रभावी ठरला नाही. त्यांनी आफ्रिकेत आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बॉक्सिंग-डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या 29 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 16, तर पाकिस्ताननं केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतं की, कसोटी प्रकारात दक्षिण आफ्रिकेचं पाकिस्तानवर वर्चस्व आहे. यासह देशांतर्गत परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेला आणखी मजबूत बनवतो.
WTC फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोलायचं झाल्यास, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एक दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करुन WTC च्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं पीसीटी सध्या 66.89 आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पीसीटी 58.89 होता, तो आता 61.46 झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियानं मोठी झेप घेतली आहे. यानंतरही संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकला नसला तरी अंतिम फेरी गाठण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसत आहे.
खेळपट्टी कशी असेल : न्यूलँड्स हे दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ मैदानांपैकी एक आहे जे फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. तथापि, वेगवान गोलंदाजीला नवीन गोलंदाजाकडून स्विंग मिळू शकते आणि नंतर खेळ जसजसा पुढं जाईल तसतशी फलंदाजी करणं थोडं सोपं होऊ शकतं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. सामना दोन दिवसांत संपला आणि भारतानं सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी कधी आणि कुठं होणार?