डरबन Playing 11 Announced : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना आज 27 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. आता या सामन्यासाठी आफ्रिकन संघानं प्लेइंग इलेव्हनची 15 तासाआधीच घोषणा केली आहे. नियमित कर्णधार टेंबा बावुमाचं पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळं तो बराच काळ संघाबाहेर होता. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात तो जखमी झाला होता. ऑगस्ट 2024 मध्ये त्यानं आफ्रिकन संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
केशव महाराजला संघात स्थान : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. यात जेराल्ड कोएत्झी, मार्को यान्सन आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डरला संधी देण्यात आली आहे. केशव महाराजकडे फिरकी विभागाची जबाबदारी आली आहे. केशवनं याआधीही अनेक सामन्यांमध्ये स्वबळावर संघाला विजय मिळवून दिला आहे. आफ्रिकन संघासाठी त्यानं आतापर्यंत 184 बळी घेतले आहेत.
फलंदाजी आक्रमण मजबूत : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी आक्रमणात एडन मॅक्रम, टोनी डीजॉर्ज, ट्रिस्टन स्टब्स आणि टेंबा बावुमा यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. स्टब्स गेल्या काही काळापासून दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली कामगिरी करत आहे आणि आवश्यकतेनुसार त्यानं महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. त्याच वेळी, मकरम आणि टोनी डी जॉर्जी हे देखील लांब डाव खेळण्यात माहिर आहेत.