चेन्नई IND vs BAN Test Record : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक), चेन्नई इथं खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं महाकाय लक्ष्य होतं. परंतु, त्यांचा संपूर्ण संघ केवळ 234 धावांवरच मर्यादित राहिला. दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर इथं खेळवला जाणार आहे.
रोहित शर्मानं कायम ठेवला ट्रेंड : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधला हा 179 वा विजय ठरला. भारताच्या 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, जिंकलेल्या सामन्यांची संख्या हरलेल्या सामन्यांपेक्षा जास्त आहे. तसंच भारतानं 580 सामन्यांपैकी 178 सामने गमावले आहेत. तर 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशविरुद्ध भारताचा धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2017 मध्ये भारतानं हैदराबाद कसोटी सामना 208 धावांनी जिंकला होता.
बांगलादेशविरुद्ध भारत अपराजित : तसं बघितलं तर, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा हा 12वा विजय आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी फक्त दोन सामने अनिर्णित राहिले (2007, 2015) आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये भारताचं वर्चस्व राहिलं. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये भारत बांगलादेशकडून अजून पराभूत झालेला नाही. हा ट्रेंड सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली सुरु झाला होता, आता सध्याचा कर्णधार रोहित शर्मानंही तो सुरु ठेवला आहे.
24 वर्षांपूर्वी झाला होता पहिला कसोटी सामना : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना सुमारे 24 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2000 मध्ये खेळला गेला होता. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता. त्या सामन्यात भारतीय संघानं 8 विकेट्सनं विजय मिळवला होता. त्यानंतर, गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2004 मध्ये बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केलं. त्यानंतर राहुल द्रविड (2007), महेंद्रसिंग धोनी (2010), विराट कोहली (2017, 2019) आणि केएल राहुल (2022) यांच्या नेतृत्वाखाली भारतानं बांगलादेशचा पराभव केला.
आठपैकी सात मालिकांमध्ये भारताचा विजय : सध्याच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 8 मालिका झाल्या आहेत. या आठ मालिकांपैकी भारतानं सात मालिका जिंकल्या आहेत. दोन देशांमधील एकमेव मालिका 2015 मध्ये अनिर्णित राहिली होती, जी एका सामन्याची होती. त्या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. आता सुरु असलेल्या नवव्या मालिकेत भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे. एक गोष्ट नक्की की भारतीय संघ सध्याची कसोटी मालिका गमावू शकत नाही.