बंगळुरु Rishabh Pant 107 Meter Six : इथं सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघातील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आणि 99 धावांची खेळी केली. मात्र, निराशाजनक बाब म्हणजे पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं. या खेळीत पंतनं 9 चौकार आणि 5 षटकारही मारले. यावेळी त्यानं मारलेला एक षटकार थेट स्टेडियमच्या बाहेर मारला.
पंतनं मारला गगनचूंबी षटकार : खरं तर, पंतनं भारतीय डावाच्या 87व्या षटकात टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंत पहिल्या चेंडूवर चुकला पण नंतर त्याला चार बाय मिळाले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो सावधपणे खेळला. यानंतर पंतसमोर तिसरा चेंडू साऊथीनं टाकताच तो पुढे आला आणि त्यानं स्लॉग स्वीप करत मिडविकेटवर षटकार ठोकला. पंतनं हा षटकार तब्बल 107 मीटर लांब मारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋषभ पंतनं हा षटकार 90 धावांवर खेळत असताना मारला. पंतचा हा षटकार इतका शानदार होता की न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स अवाक झाला. या षटकारानंतर तो आपल्या शतकाच्या अगदी जवळ आला, पण तरीही पंतनं स्वत:ला रोखलं नाही. त्यामुळं त्याचं शतक हुकलं. मात्र, बाद होण्यापूर्वी पंतनं सर्फराज खानसोबत 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम केलं. विशेष म्हणजे पंत जखमी असूनही तो भारतीय संघा फलंदाजीसाठी मैदानात उतरला.