ठाणे Youngest Swimmer : ठाण्यातील स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचा सर्वात लहान असलेला 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरनं विजयदुर्ग येथील समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलं आहे. यासह 15 किमीचं अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकाँर्डनं घेतली आहे. ठाणेकर जलतरणपटू रेयांशची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या वर्षभरात मिळवली 13 पदकं : रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव इथं दररोज सराव करत आहे. रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं शाळेनंही कौतुक केलं आहे. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धामध्ये रेयांशनं 13 पदकं प्राप्त केली असून यात 5 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.
रेयांशनं केला नवा विक्रम : विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करुन रेयांशनं एक नवा विक्रम केला. त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेवून त्याचा सन्मान केला आहे. सन 2024 मध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभाग घेत होता. 2 जून 2024 रोजी ठाणे इथं झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 25 मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक तर 50 मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केलं. 6 जुलै 2024 रोजी कोल्हापूर इथं झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्यानं 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.