नवी दिल्ली Virat Kohli 16 years of International Cricket : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण केली आहेत. विराट 2008 पासून आतापर्यंत भारताकडून क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यानं 18 ऑगस्टलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं या आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. आज या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला विराट कोहलीशी संबंधित काही खास गोष्टी आणि मोठे रेकॉर्ड सांगणार आहोत.
कोहलीचे विराट रेकॉर्ड्स :
- विराट कोहलीनं 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 175 वा खेळाडू ठरला. विराटनं पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात केवळ 12 धावा केल्या. मात्र या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.
- विराट कोहलीनं 2009 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात त्यानं 107 धावांची शानदार खेळी खेळली.
- विराट काही वर्षांतच भारतीय संघासाठी खास खेळाडू बनला आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता. एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये 2 फेब्रुवारी रोजी मीरपूर इथं बांगलादेशविरुद्ध त्यानं पहिलं एकदिवसीय विश्वचषक शतक झळकावलं. यादरम्यान त्यानं 100 धावांची नाबाद खेळी खेळली.
- विराट कोहलीनं 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हरारे इथं झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात त्यानं 26 धावांची नाबाद खेळी खेळली. विराटच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये फक्त एकच शतक आहे, जे त्यानं 8 सप्टेंबरला आशिया कप 2022 मध्ये दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केलं होतं. त्यानं या डावात 122 धावांची खेळी केली.
- विराटनं 30 जून 2011 रोजी भारताकडून कसोटीत पदार्पण केलं. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्यानं पहिल्या डावात 4 धावा आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या. विराटनं 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये आता तब्बल 7 द्विशतकं आहेत.
- आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा जगातील पहिला फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्याच्या नावावर 38 अर्धशतकं आहेत.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा जगातील चौथा फलंदाज आहे. त्याच्या पुढं सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग आहेत. विराटनं 533 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 26 हजार 942 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 80 शतकं आणि 140 अर्धशतकांची नोंद आहे.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं झळकावणारा तो पृथ्वीवरील एकमेव खेळाडू आहे. त्यानं 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला होता.