बंगळुरू RCB vs SRH IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 30 वा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी मैदानावर सोमवारी खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करत आपलाच जुना रेकॉर्ड ब्रेक केला. त्यासह सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर 25 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे हैदराबाद संघाचा धडाकेबाज फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या वादळी खेळीनं एम चिन्नास्वामी मैदानात चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यानं केवळ 39 चेंडूत आपलं शतक साजरं केलं.
सनरायझर्स हैदराबादची रेकॉर्ड ब्रेक खेळी :बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानात सनरायझर्स हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या गोलंदाजांची पिसं काढली. ट्रेव्हिस हेडच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. ट्रेव्हिस हेड यानं केवळ 39 चेंडूत शतक साजरं केलं. त्याच्या शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघानं आपला जुना सर्वाधिक धावांचा विक्रम मोडत रेकॉर्ड बेर्क 287 धावा केल्या. हैदराबाद संघाचा फलंदाज हेनरिक क्लासेन यानंही अर्धशतकी पारी खेळली.