गकबेर्हा Leading Wicket-Taker in T20 Cricket :आयसीसीची मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आता जवळ आली आहे. याआधी, एकीकडे संघ आपापली तयारी करत असताना, खेळाडू वेगवेगळ्या लीगमध्ये खेळून त्यांची तयारी अंतिम करत आहेत. दरम्यान, एक नवीन विक्रम रचला गेला आहे. हा आंतरराष्ट्रीय विक्रम नाही, पण तरीही त्याचं खूप महत्त्व आहे. अफगाणिस्तानचा युवा खेळाडू रशीद खान आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं जगभरातील दिग्गज गोलंदाजांना मागं टाकलं आहे.
रशीद खाननं T20 क्रिकेटमध्ये पुर्ण केल्या 633 विकेट्स : रशीद खान आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं घेतलेल्या विकेटची संख्या आता 633 झाली आहे. यासह त्यानं वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला मागं टाकलं आहे, जो अव्वल स्थानावर होता, हा विक्रम त्यानं खूप पूर्वी केला होता. 2015 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रशीद खाननं आतापर्यंत 461 T20 सामने खेळले आहेत आणि एकूण 633 विकेट्स घेतल्या आहेत. यात लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विकेट्सचा समावेश आहे. या T20 क्रिकेटमध्ये रशीद खानची सरासरी आतापर्यंत 18च्या आसपास आहे आणि तो साडेसहा च्या इकॉनॉमीनं विकेट्स घेत आहे. जरी तो आता T20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असला तरी, रशीद खानला बऱ्याच काळापासून नंबर वन गोलंदाज मानलं जातं.
रशीद खान T20 मध्ये घेऊ शकतो 1000 विकेट्स : जर आपण ड्वेन ब्राव्होबद्दल बोललो तर 2006 मध्ये पदार्पणानंतर त्यानं 582 सामन्यांमध्ये 631 विकेट्स घेतल्या आहेत. तो बराच काळ नंबर वनच्या खुर्चीवर बसला होता, पण आता त्याला दुसऱ्या क्रमांकावर जावं लागणार आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही गोलंदाजाला T20 क्रिकेटमध्ये 1000 बळी घेता आलेले नाहीत, परंतु रशीद खान ज्या वेगानं धावत आहे, त्यामुळं तो असा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनू शकतो. रशीद फक्त 26 वर्षांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त तो जगभरातील लीगमध्ये खेळतो, त्यामुळं ही कामगिरी करणे त्याच्यासाठी कठीण काम नसेल. येणाऱ्या काळात तो क्रिकेटच्या जगात कसा गोलंदाजी करतो हे पाहणं बाकी आहे. मात्र सध्या तरी T20 क्रिकेटमध्ये त्याच्या जवळपासही गोलंदाज नाही.