चेन्नई R Ashwin century On Day 1 of Chennai Test : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला शानदार सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टार फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं 80 षटकांत 6 बाद 339 धावा केल्या होत्या. अश्विन (102) आणि जडेजा (86) नाबाद आहेत.
भारताला अडचणीतून काडलं बाहेर : या दोघांनी आपल्या फलंदाजीनं बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेतला आणि भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 34 धावांत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर संघानं 144 धावांवर 5वी विकेट गमावली. यानंतर जडेजानं सातव्या क्रमांकावर येऊन पन्नास धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या अश्विननं 108 चेंडूत शतक झळकावलं. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे सहावं शतक होतं. याआधीही अश्विननं फेब्रुवारी 2021 मध्ये चेन्नईमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्यानं शतक झळकावलं. त्यानं आपल्या शतकी खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले.
शतक झळकावत रचला इतिहास : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं (अण्णा) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर फलंदाज म्हणून विक्रमी कामगिरी केली. जे त्याचं घरचं मैदान आहे. रविचंद्रन अश्विननं कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक झळकावलं. या खेळीसह त्यानं अनेक विक्रम रचले. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यानं संघ अडचणीत असताना फलंदाजी करत दमदार शतक झळकावलं. या शतकासह आर अश्विन हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेतले आहेत आणि 6 शतकं झळकावली आहेत. आर अश्विननं रवींद्र जडेजासोबत बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतासाठी सर्वात मोठी भागीदारीही केली.