मुंबई Paris Olympics 2024 Swapnil Kusale :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेनं इतिहास रचलाय. प्रथमच, भारतीय नेमबाजानं या ऑलिम्पिक स्पर्धेत म्हणजे 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत पदक जिंकलं. यासह कुसाळेनं भारताला तिसरं पदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारतानं तिन्ही पदकं नेमबाजी क्रीडाप्रकारात मिळवली आहेत.
धोनीसारखी आहे कुसाळेची कहाणी : कुसाळेच्या यशाची कहाणी महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीसारखी आहे. धोनीप्रमाणेच कुसाळेदेखील मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर आहे. स्वप्निल कुसाळे आज (21 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता अंतिम फेरीत खेळण्यासाठी आला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा कुसाळे हा पहिला भारतीय होता. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्यानं भारतासाठी पदक जिंकलं.
आई सरपंच आणि वडील शिक्षक : कोल्हापूर म्हटलं की प्रत्येकाला फुटबॉल आठवतं. येथील प्रत्येक पेठांमध्ये आणि गावांमध्ये एक तरी फुटबॉल खेळाडू असतोच. मात्र, मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथं राहणारा 29 वर्षीय स्वप्नील सुरेश कुसाळे याला अपवाद ठरला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. तर आई ही गावाची सरपंच असून वारकरी संप्रदायातील आहे. तर स्वप्नीलला एक लहान भाऊ सूरज हादेखील क्रीडा शिक्षक आहे. स्वप्नील लहान असल्यापासूनच घरामध्ये आई वारकरी संप्रदायातील धार्मिक आणि वडील शिक्षक असल्यानं भक्तिमय शैक्षणिक वातावरण होतं. स्वप्नीलचं पहिली ते चौथीचं शिक्षण राधानगरी तालुक्यातील हजार-बाराशे व्यक्तींचं छोटंसं गाव असलेल्या कांबळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. यानंतर पाचवी ते सातवी त्याचं भोगावती पब्लिक स्कूल इथं पुढील शिक्षण झालं. याचवेळी त्याला क्रीडा विषयात आवड निर्माण झाली. त्याचं पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून सांगली इथं प्रशिक्षणासाठी सेंटर मिळालं. यामुळं त्यानं सांगली इथं पुढील शिक्षण सराव सुरू केला.