मुंबई Swapnil Kusale Won Bronze Medal : कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलंय. यापूर्वी मनु भाकरनं एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. यानंतर स्वप्नीलचं राज्य तसंच देशभरातून अभिनंदन केलं जातय.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलय. तसंच स्वप्नीलमुळं कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असं पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचं स्मरण झालं. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलनं महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलनं कायम राखली असून कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलनं आपलं राज्य आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवलय. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलनं महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवलाय. स्वप्नीलच्या या यशात त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचं मोलाचं योगदान आहे. या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीनं अभिनंदन, असं नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढंही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असं सर्व सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही दिलीय.