पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दुसऱ्या गट सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत अर्जेंटिनाशी 1-1 अशी बरोबरी साधली. अर्जेंटिनासाठी एकमेव गोल लुकास मार्टिनेझनं (22 व्या मिनिटाला) केला. त्याचवेळी सामना संपण्याच्या अवघ्या 1 मिनिटापूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं आणि स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला.
हरमनप्रीत सिंगनं केला शानदार गोल :अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात भारत पराभवाकडं वाटचाल करत होता. चौथ्या क्वार्टरअखेर अर्जेंटिनाकडं 1-0 अशी आघाडी होती. पण, 59व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरनं आशेचा किरण दाखवला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं इथं कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला आणि स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. या बरोबरीसह भारत पूल बी मध्ये तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
अर्जेंटिनानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये केला एक गोल : भारतानं सामन्याची सुरुवात आक्रमक केली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र, दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. परिणामी पहिला क्वार्टर गोलशून्य राहिला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक उत्तम संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना गोल करता आला नाही. त्यानंतर 22व्या मिनिटाला लुकास मार्टिनेझनं केलेल्या शानदार गोलमुळं अर्जेंटिनानं हाफ टाईमला भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली.
तिसरा क्वार्टर ठरला रोमांचक : सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं आक्रमक सुरुवात केली. भारताच्या सुखजीतनं 33व्या मिनिटाला शानदार फटकेबाजी केली. पण अर्जेंटिनाच्या गोलकीपरनं अप्रतिम बचाव केला. भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये अनेक प्रतिआक्रमण केले पण ते अर्जेंटिनाच्या बचावफळीला भेदण्यात अपयशी ठरले. अर्जेंटिनाला 38व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी स्ट्रोक मिळाला, मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात ते अपयशी ठरले.
हेही वाचा :
- 'अर्जुना'नं थोडक्यात चुकवला 'नेम'; दिवसभरात भारताला दुसऱ्यांदा पदकाची हुलकावणी - Paris Olympics 2024