पॅरिस Paris Olympics 2024 Javelin Throw Prize Money : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भालाफेकच्या अंतिम फेरीत भारताच्या 'गोल्डन बॉय'ला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र, या 26 वर्षीय भारतीय खेळाडूनं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचला. ट्रॅक आणि फील्डमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. या स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं सर्वांना चकित करत ऑलिम्पिक विक्रम मोडीत काढला. नदीमनं 92.97 मीटर फेक करुन नवा ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे नदीमनं 32 वर्षांनंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं.
सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला किती बक्षीस : टोकियो ऑलिम्पिकपर्यंत, कोणत्याही विजेत्याला बक्षीस रक्कम दिली जात नव्हती. परंतु पॅरिस ऑलिम्पिक 2024 पासून, जागतिक ऍथलेटिक्सनं बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या भालाफेकपटू नदीमला सुवर्णपदक जिंकल्याबद्दल 50 हजार डॉलर्सचं बक्षीस देण्यात आलं. पाकिस्तानी रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 1 कोटी 40 लाख रुपये आहे. ही बक्षीस रक्कम कोणत्याही ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी दिली जाते. ॲथलेटिक्सशिवाय पॅरिस ऑलिम्पिकमधील इतर कोणत्याही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम देण्यात आलेली नाही.