पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या या स्टार शटलर जोडीला मलेशियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मलेशियाच्या ॲरॉन चिया आणि सोह वुई यिक या जोडीनं भारतीय जोडीचा 21-13, 14-21, 21-16 असा पराभव केला. या विजयासह मलेशियाच्या जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
पहिल्या सेटमध्ये सात्विक-चिरागची स्फोटक सुरुवात : भारतीय जोडीनं या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्या सेटच्या सुरुवातीलाच अनेक जबरदस्त स्मॅश मारले. मलेशियाच्या जोडीनंही चुरशीची लढत दिली आणि पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सात्विक-चिराग जोडी 11-10 अशा थोड्या फरकानं पुढं होती. मात्र, ब्रेकनंतर भारतानं चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी न देता पहिला सेट 21-13 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मलेशियानं केलं पुनरागमन : पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीनं कडवी टक्कर दिली. टोकियो 2020 कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या चिया-सोहनं दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले. मलेशियाच्या जोडीनं सामन्यात प्रथमच 5-4 अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये मलेशियाच्या जोडीनं कोणतीही चूक न करता आक्रमक पद्धतीचा अवलंब करत भारतीय जोडीचा 21-14 असा पराभव केला.
निर्णायक सेटमध्ये पराभव : तिसरा सेट भारत आणि मलेशिया यांच्यात चुरशीचा ठरला. भारतीय जोडी 5-2 पिछाडीवर असताना शानदार खेळ करत 5-5 अशी बरोबरी साधली. दोन्ही जोडीपैकी कोणीही पराभव स्वीकारण्यास तयार नव्हतं परिणामी दोघांमधील तिसरा सेट खूपच रोमांचक झाला. सात्विक-चिराग यांनी त्यांचं आक्रमण सुरुच ठेवलं आणि मध्यांतरापर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. सात्विक-चिरागनं प्रतिस्पर्ध्याला अनेक वेळा नेटमध्ये शटल मारण्यास भाग पाडले, दोघांनीही अनेक जबरदस्त स्मॅश मारले. पण, मलेशियाच्या जोडीनंही अनेक उत्कृष्ट फटके मारत सामना चुरशीचा केला आणि स्कोअर 14-14 असा बरोबरीत आणला. ब्रेकनंतर भारतीय जोडीचा वेग कमी झाला आणि त्यांना केवळ 3 गुण करता आले. शेवटी या जोडीला 21-16 असा पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या स्टार बॉक्सरचं आव्हान संपुष्टात - Paris Olympics 2024
- एक हात खिशात टाकून 51 वर्षीय खेळाडूनं नेमबाजीत जिंकलं रौप्यपदक, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क - Paris Olympics 2024