पॅरिस Paris Olympics 2024 :ऐतिहासिक सीन नदीवर झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात हिंदीला खास मान मिळाला. 'सिस्टरहुड' या नावानं फ्रान्सच्या महिलांनी दिलेला पाठिंबा दर्शवण्यासाठी काही इन्फोग्राफिक्स सादर करण्यात आले. त्यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली होती. तिथं सादर केलेल्या या इन्फोग्राफिक्समधील सहा भाषांपैकी हिंदी देखील एक भाषा होती. याची अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. फोटो शेअर करताना एका नेटिझननं सांगितलं की, यातून फ्रान्ससोबत मजबूत राजनैतिक संबंध दिसून येतात. यामुळं अनेकांना आनंद झाला असून ही अभिमानाची बाब असल्याचं पोस्ट केलं.
पीव्ही सिंधू आणि सरथ कमल भारताचे ध्वजवाहक : ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन समारंभ नदीत पार पडला. 85 बोटींमधील 6,800 खेळाडूंनी पाण्यावर 6 किलोमीटरच्या परेडमध्ये भाग घेतला. या सोहळ्याला 3 लाख 20 हजांरांपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. एका छोट्या बोटीतील तीन मुलं ऑलिम्पिक मशाल घेऊन आलेल्या मुखवटा घातलेल्या माणसानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. फ्रेंच वर्णक्रमानुसार भारत हा 84 वा देश आहे. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस दिग्गज सरथ कमल हे भारताचे ध्वजवाहक होते. दोघंही तिरंगा ध्वज हातात धरुन समोर उभे होते, तर खेळाडूंना घेऊन जाणारी बोट त्यांच्या मागे होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू दिसणार आहेत. यात नीरज चोप्रा (भालाफेक), पीव्ही सिंधू (बॅडमिंटन) आणि कुस्तीमध्ये भारतीय कुस्तीपटूंकडून देशाला पदकांची अपेक्षा आहे.