पॅरिस Paris Olympics 2024 Table Tennis : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार पॅडलर शरथ कमलला स्लोव्हेनियाविरुद्ध पुरुष एकेरीच्या लढतीत कोजुल डेनीकडून पराभव स्वीकारावा लागला. स्लोव्हेनियाच्या डेनीनं शरथचा 49 मिनिटांत 4-2 असा पराभव केला. या पराभवासह त्याचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. तोच दुसरीकडे भारताची स्टार पॅडलर श्रीजा अकुलानं नेत्रदीपक विजयासह महिला एकेरीच्या टेबल टेनिसच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसंच मनिका बत्रानंही राउंड ऑफ 64 च्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या हर्सी अन्नाविरुद्ध सहज विजय मिळवला.
कसा गमावला सामना : पहिला सेट जिंकल्यानंतर शरथनं सलग तीन सेट गमावले, पहिल्या सेटमध्ये शरथने 12-10 असा विजय मिळवला. त्यानंतर सलग तीन सेट गमावले. दुसऱ्या सेटमध्ये स्लोव्हेनियाचा प्रतिस्पर्धी खेळाडू कोझुल डेनीनं त्याला 11-9 नं पराभूत केलं, त्यासाठी त्याला फक्त 8 मिनिटं लागली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये 8 मिनिटांत 11-6 आणि चौथ्या सेटमध्ये 11-7 असा विजय मिळवला. शरथ कमलनं पाचव्या सेटमध्ये चमकदार कामगिरी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यात त्यानं डेनीचा 11-8 असा पराभव केला. सहाव्या सेटमध्ये शरथ कमलनं चमकदार कामगिरी करत आघाडी घेतली होती. त्यानंतर डेनीनं जोरदार पुनरागमन करत त्याला 12-10 नं पराभूत केलं. त्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकसाठी शरथ कमलची मोहीम इथंच संपली आहे.
श्रीजा अकुलाचा शानदार विजय : तोच दुसरीकडे भारताची स्टार पॅडलर श्रीजा अकुलानं नेत्रदीपक विजयासह महिला एकेरीच्या टेबल टेनिसच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रविवारी झालेल्या सामन्यात 16व्या मानांकित अकुलानं जागतिक क्रमवारीत 58व्या क्रमांकावर असलेल्या कलबर्गवर 30 मिनिटांत 11-4, 11-9, 11-7, 11-8 असा विजय मिळवला.