नवी दिल्ली ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान पुढील वर्षी 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाकिस्तान आतापासून तयारी करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानचा दौरा करेल अशी पाकिस्तानला पूर्ण आशा आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न येण्याचा सल्ला दिला आहे. त्यानं भारत आणि भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
काय म्हणाला दानिश कनेरिया : माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी स्पोर्ट्स तकला सांगितलं की, 'पाकिस्तानमधील परिस्थिती बघा, मी म्हणतो की भारतीय संघानं पाकिस्तानात जाऊ नये.' तो पुढं म्हणालं, पाकिस्ताननं याचा विचार करावा, त्यानंतर आयसीसी आपला निर्णय घेईल आणि बहुधा ते हायब्रीड मॉडेल असेल, ते दुबईमध्ये खेळले जाईल. खेळाडूंची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे. तर आदर ही दुसरी प्राथमिकता आहे. अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं बीसीसीआय खूप चांगलं काम करत आहे. सर्व देश अंतिम निर्णय स्वीकारतील.
सरकारच्या परवानगीवर अवलंबून : यापूर्वी पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रशीद लतीफ म्हणाला होता की, 'भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार हे 50 टक्के निश्चित आहे. यामागचा तर्क असा होता की, जय शाह यांना आयसीसीचं अध्यक्ष बनण्यास पाकिस्ताननं विरोध केला नाही, ज्यामुळं भारताचा पाकिस्तान दौरा जवळजवळ शक्य आहे.' भारताच्या बाजूनं असं कोणतंही स्पष्टीकरण नाही. तथापि, भारताचे सामने हायब्रीड मॉडेलच्या आधारावर इतर ठिकाणी आयोजित केले जावेत अशी भारताची इच्छा आहे. मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर येण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं होतं. मात्र, त्यासाठी बीसीसीआय सरकारच्या परवानगीवर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं.
जर भारत सरकारनं क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली, तर 2008 नंतर पहिल्यांदाच भारत 16 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे. लॉजिस्टिकची चिंता कमी करण्यासाठी सीमेजवळील लाहोर इथं भारताचे सामने आयोजित केले जातील, असं प्रारंभिक अहवालांनी सूचित केलं आहे.
हेही वाचा :
- खेळाडूंना वेळेवर मदत मिळावी... ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेनं उपस्थित केला मोठा प्रश्न - Swapnil Kusale
- पाकिस्तान कंगाल... हॉकी संघाला चीनला जाण्यासाठी घ्यावं लागलं कर्ज - Pakistan Hockey Team