मुलतान Pakistan Squad Announced : पाकिस्तान क्रिकेट संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि T20 मालिका खेळायची आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चार संघांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे पीसीबीनं चारही संघात एकाही खेळाडूला कर्णधार बनवलेलं नाही. काही काळापूर्वी बाबर आझमनं मर्यादित षटकांचं कर्णधारपद सोडलं होतं. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान चालेल, तर झिम्बाब्वे दौऱ्यात 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत बुलावायो इथं खेळवले जातील.
बाबर आझमचं पुनरागमन : बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आलं होतं. आता हे तिन्ही खेळाडू वनडे संघात परतले आहेत. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी उपलब्ध असतील. वनडे संघातील अनकॅप्ड खेळाडूंमध्ये आमिर जमाल, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसीबुल्ला, मुहम्मद इरफान खान आणि सॅम अयुब यांचा समावेश आहे. जहाँदाद खान आणि सलमान अली आगा पहिल्यांदाच T20 संघात सामील झाले आहेत.
मोहम्मद हसनैनचं पुनरागमन : चॅम्पियन्स वनडे कपमध्ये फास्ट बॉलर मोहम्मद हसनैनं गेल्या महिन्यात फैसलाबादमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या, तो देखील एकदिवसीय संघात परतला आहे, जो जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. वनडे संघाचे सात खेळाडू बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी 28 ऑक्टोबरला मेलबर्नला पोहोचतील. तर उर्वरित खेळाडू 29 ऑक्टोबरला रवाना होतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि T20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ :
वनडे संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.