3 Wickets in 2 Balls : क्रिकेटच्या मैदानावर अनेक अनोखे विक्रम केले गेले आहेत, परंतु काही विक्रम असे आहेत ज्यांच्या बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. क्रिकेटमध्ये सलग 3 चेंडूंवर हॅटट्रिक विकेट घेतली जाते, पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की एखाद्या गोलंदाजानं 2 चेंडूंवर हॅटट्रिक विकेट घेतल्याचं? मात्र क्रिकेट विश्वात हे घडले आहे. भारतीय फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे यानं IPL मध्ये असा अनोखा पराक्रम केला आहे. IPL च्या इतिहासात तांबे हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर 2 चेंडूत हॅट्ट्रिक विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला गेला आहे.
कशा घेतल्या दोन चेंडूत तीन विकेट : तांबेनं 2014 च्या IPL मध्ये हा पराक्रम केला होता. 2014 मध्ये, तांबे राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा सदस्य होता, त्यानं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) हा अनोखा पराक्रम केला. प्रत्यक्षात असं घडलं की KKR च्या डावाच्या 16व्या षटकात तांबेनं पहिला चेंडू टाकला जो गुगली होता, ज्यावर मनीष पांडे यष्टीचीत झाला. तांबेनं टाकलेला चेंडू पांडेनं पुढं सरकत खेळण्याचा प्रयत्न केला पण हा चेंडू गुगली होता आणि स्टंपच्या बाहेरही होता. अशा स्थितीत मनीष पांडे चेंडू खेळण्यात अयशस्वी ठरला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसननं चेंडू सहज पकडला आणि यष्टीचीत केली. विशेष म्हणजे तांबेला ही विकेट वाईड बॉलवर मिळाली. यानंतर तांबेनं पहिल्या कायदेशीर चेंडूवर युसूफ पठाणला बाद केलं. या षटकाच्या दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर, गोलंदाजानं रायन टेन डोशेटला एलबीडब्ल्यू बाद करुन विकेट्सची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तांबेनं टाकलेला पहिला चेंडू वाईड असला तरी, त्यानं घेतलेली ही हॅट्ट्रिक विकेट आजपर्यंत आयपीएलमध्ये तांबेच्या या विक्रमाची पुनरावृत्ती कोणीही केलेली नाही.