रावळपिंडी PAK vs ENG 3rd Test : अनेक सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली. पाकिस्तानी संघानं मुलतान इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. ज्यामुळं पाकिस्ताननं हा सामना जिंकला, तेच सुत्र रावळपिंडीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही राबवण्यात आलं. त्याचाच परिणाम असा झाला की तब्बल 142 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये एक विशेष दृश्य पाहायला मिळालं. शेवटच्या कसोटीप्रमाणे या सामन्यातही पाकिस्ताननं आपल्या फिरकी जाळ्यात इंग्लंडला अडकवलं आणि असं घडलं की संपूर्ण डावात एकाही वेगवान गोलंदाजानं एकही चेंडू टाकला नाही, जे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडलं आहे.
पाकिस्तान फिरकीपटूंवर अवलंबून : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला. चर्चा आणि अपेक्षेप्रमाणे या सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर केवळ फिरकीपटूंनाच मदत मिळाली. पाकिस्ताननं दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी आक्रमणाच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केलं होतं, जो फेब्रुवारी 2021 नंतर घरच्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय होता. नोमान अली आणि साजिद खान या फिरकी जोडीनं पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. दोन्ही गोलंदाजांनी त्या कसोटीत इंग्लंडच्या सर्व 20 विकेट (दोन्ही डाव एकत्र) घेतल्या. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फक्त या दोघांनीच गोलंदाजी केली.
फिरकीपटूंनी केली पुर्ण गोलंदाजी : अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानी संघानं हाच फॉर्म्युला स्वीकारत दोन्ही फिरकीपटूंसह गोलंदाजीला सुरुवात केली. याचा फायदा पाकिस्तानलाही मिळाला आणि इंग्लंडचा संघ अवघ्या 267 धावांत गारद झाला. यात दोघांनी 42 षटकं सतत गोलंदाजी केली, त्यानंतर प्रथमच गोलंदाजीत बदल करण्यात आला, परंतु नंतर एक फिरकी गोलंदाज जाहिद महमूद आणि काही काळानंतर दुसरा फिरकी गोलंदाज सलमान अली आगा याला गोलंदाजी करायला लावली.