मुंबई T20 World Cup 2007 : दोन महिन्यापूर्वी झालेल्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकचा पराभव करत दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरलं. मात्र 17 पूर्वी 2007 मध्ये आजच्याच दिवशी महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली युवा भारतीय संघानं अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत पहिल्याच आवृत्तीत T20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. आज या अविस्मरणीय कामगिरीला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्या अंतिम सामन्यावर एक नजर...
धोनीनं बनवलं भारताला चॅम्पियन : T20 विश्वचषक 2007 च्या भारतीय संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते. त्यानंतरही धोनीला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची संधी मिळाली. अशा स्थितीत धोनी आणि त्याच्या संघाला कोणत्याही तज्ज्ञानं फारसं महत्त्व दिलं नाही. पण युवा आणि वरिष्ठ खेळाडूंच्या नेतृत्वाखाली संघानं ज्या पद्धतीनं कामगिरी केली, त्यामुळं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आणि अंतिम फेरी गाठेपर्यंत धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सर्वांचा आवडता संघ बनला होता. अंतिम सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करुन T20 विश्वचषकाचा पहिलाच हंगाम जिंकला होता.
भारताचा लीग स्टेजचा प्रवास कसा :
- भारताचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होता जो पावसामुळे रद्द झाला होता.
- पाकिस्तानसोबतच्या दुसऱ्या सामन्यात भारत 141 धावांवर बरोबरीत होता आणि भारतानं तो 'बॉल आऊट'मध्ये जिंकला होता.
- तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 10 धावांनी पराभव केला.
- चौथ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी पराभव केला.
- पाचव्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 37 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
कसा होता उपांत्य फेरीचा प्रवास? : उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात भारतानं प्रथम खेळताना 20 षटकांत 5 गडी गमावून 188 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत 173 धावांत सर्वबाद झाला आणि भारतानं 15 धावांनी सामना जिंकून अंतिम फेरी गाठली.
कसा झाला भारत-पाकिस्तान अंतिम सामना? : T20 वर्ल्ड कप 2007 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात धोनीच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट गमावत 157 धावा केल्या. भारतानं दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.3 षटकांत 152 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात एकवेळ पाकिस्ताननं 9 विकेट गमावल्या होत्या. मिसबाह उल हक क्रीजवर फलंदाजी करत होता. त्यावेळी भारताकडून जोगिंदर शर्मा गोलंदाजी करत होता. अशा स्थितीत पाकिस्तानला विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. त्यानंतर जोगिंदरच्या चेंडूवर मिसबाहनं स्कूप शॉट खेळला आणि चेंडू हवेत डीप फाइन लेगच्या दिशेनं गेला. एस श्रीशांत या बॉलखाली उभा होता, त्यानं हा झेल पकडला आणि भारताला T20 वर्ल्ड कप 2007 च्या पहिल्या सत्राचं विजेता बनवलं.
कोणत्या खेळाडूंनी भारतासाठी दमदार कामगिरी :
- गौतम गंभीरनं 7 सामन्यांत 3 अर्धशतकांसह 227 धावा केल्या.
- एमएस धोनीनं 7 सामन्यांत 154 धावा केल्या
- युवराज सिंगनं 7 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 148 धावा केल्या.
- वीरेंद्र सेहवागनं 6 सामन्यांत 1 अर्धशतकासह 133 धावा केल्या.
- आरपी सिंगनं 7 सामन्यांत 12 विकेट घेतल्या
- इरफान पठाणनं 7 सामन्यांत 10 विकेट घेतल्या